
गुहागर (प्रतिनिधी – मंगेश जाधव) : ग्रामविकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत गुहागर तालुक्यातील खामशेत ग्रामपंचायतीने राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२६-२७ अंतर्गत महाराष्ट्रातील उत्कृष्ट ग्रामपंचायतींच्या पुरस्कार सोहळ्यात खामशेत ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या यशामुळे गुहागर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
नाशिक येथे आयोजित या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंचायत राज व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत खामशेत ग्रामपंचायतीला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
खामशेतचे सरपंच मंगेश सोलकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
यावेळी पंचायत समिती गुहागरचे सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील, गटविकास अधिकारी प्रदीप शिंदे, खामशेतचे प्रशासक चंद्रकांत कारंडे, साईनाथ बागुल, कृष्णादेव कदम, ग्रामसेवक मोहीरे यांच्यासह साखरीचे सरपंच त्रिशूल, धोपावेचे सरपंच आशीर्वाद पावसकर, खोडदेचे सरपंच प्रतीक पवार आणि पंचायत समिती व ग्रामपंचायतींचे अधिकारी उपस्थित होते.
खामशेत ग्रामपंचायतीने मिळवलेले हे यश गावाच्या विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना मिळालेली राज्यस्तरीय पोचपावती मानली जात आहे. या पुरस्कारामुळे खामशेत गावाची राज्यस्तरावर विशेष ओळख निर्माण झाली असून, तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींसाठीही ही कामगिरी प्रेरणादायी ठरणार आहे.
खामशेत ग्रामपंचायतीच्या या यशाबद्दल ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायत प्रशासनाचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.



