कोकणरत्नागिरीसामाजिक

शिरळमध्ये ‘मिशन बंधारे’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद! ग्रामस्थ, विद्यार्थी आणि शिक्षकांचे श्रमदान;

जलसंधारणासाठी ग्रामपंचायतीचा पुढाकार

शिरळ, चिपळूण (अजय पवार) : पाणीटंचाईवर मात करण्यासोबतच भूजल पातळी वाढवून पाण्याचे स्रोत बळकट करण्याच्या उद्देशाने चिपळूण तालुक्यातील शिरळ ग्रामपंचायतीच्या वतीने ‘मिशन बंधारे’ अभियान उत्साहात राबविण्यात आले. ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक सुप्रियाताई कदम यांच्या नियोजन व मार्गदर्शनाखाली या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या अभियानांतर्गत गावातील ओढे आणि नाल्यांवर लोकसहभागातून वनराई व तात्पुरते बंधारे बांधण्यात आले. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरवणे, भूजल पातळी वाढवणे आणि भविष्यातील पाणीटंचाई कमी करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

ग्रामसेवक सुप्रियाताई कदम यांनी ग्रामस्थांना जलसंधारणाचे महत्त्व पटवून देत अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गावातील अबालवृद्धांसह जिल्हा परिषद केंद्रीय शाळा शिरळ क्रमांक १ येथील विद्यार्थी व शिक्षकांनीही मोठ्या उत्साहाने श्रमदान केले. ग्रामस्थ, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या एकत्रित सहभागामुळे अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले.

बंधाऱ्यांमुळे पाणी अडवून भूजल पातळी वाढण्यास मदत होईल, असा विश्वास ग्रामसेवक सुप्रियाताई कदम यांनी यावेळी व्यक्त केला. या अभियानाच्या यशस्वितेसाठी सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी मोलाचे योगदान दिले.

जलसंधारणाच्या कामात लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे. शिरळ ग्रामपंचायतीच्या या पुढाकारामुळे पाणी बचत आणि जलसंधारणाबाबत जनजागृती होण्यास मदत झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button