तळवली पोस्ट ऑफिसचा कारभार ‘राम’भरोसे!
दोन महिन्यांपासून इंटरनेट बंद; डाक सहाय्यकाच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह! वरिष्ठ अधिकारी कारवाई करणार का?

तळवली (प्रतिनिधी) : गुहागर तालुक्यातील तळवली पोस्ट ऑफिसमध्ये गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ इंटरनेट सेवा बंद असल्याने नागरिकांना नाहक फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्यातच डाक सहाय्यक रामराज मीना यांच्या कार्यालयातील उपस्थितीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. नागरिकांच्या समस्यांबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी दिलेल्या उत्तरांमुळे त्यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे इंटरनेट सेवा बंद, तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत तक्रार, यामुळे तळवली पोस्ट ऑफिसचा कारभार सध्या ‘राम’भरोसे असल्याचे चित्र समोर आले आहे.
पोस्ट ऑफिसची कार्यालयीन वेळ सकाळी ९ वाजताची असताना, २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.४७ वाजेपर्यंत डाक सहाय्यक रामराज मीना उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. यापूर्वी सकाळी ९.१० वाजता इंटरनेटच्या समस्येबाबत माहिती घेण्यासाठी पोस्ट ऑफिसला भेट दिली असता ते उपस्थित नव्हते. हे महाशय नुकतेच १० दिवस रजेवरही जाऊन आले होते.
यानंतर येथील कर्मचारी यांचेमार्फत संपर्क साधण्यात आला. संपर्क करून सांगितल्यानंतर सुमारे १५ ते २० मिनिटे उलटून गेल्यानंतरही ते कार्यालयात पोहोचले नसल्याचा अनुभव आला. मात्र, दूरध्वनीवरून कार्यालयीन वेळ विचारून आपण किती वाजता उपस्थित झालात, अशी विचारणा केली असता रामराज मीना यांनी आपण सकाळी ९ वाजताच आल्याचे सांगितले. प्रत्यक्ष परिस्थिती निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्यांनी आपली भूमिका कायम ठेवली. म्हणजे हे महाशय एका जबाबदार पदावर असताना एवढं खोटं बोलत असतील तर येथील ग्रामीण भागातील लोकांजवळ कशाप्रकारे वर्तन करत असतील याची कल्पना येते. त्यांच्या या वर्तनाविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे.
एकीकडे इंटरनेट बंद, दुसरीकडे उपस्थितीबाबत प्रश्न; जबाबदारी घेणार कोण?
गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ इंटरनेट सेवा बंद असल्याने पोस्टाच्या कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना वेळ आणि पैसा खर्च करून कार्यालयात यावे लागते. मात्र, आवश्यक सेवा उपलब्ध नसल्यास त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागते. नागरिकांच्या या गैरसोयीची जबाबदारी नेमकी कोण घेणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
कर्मचाऱ्यांनी जनतेला वेळेवर सेवा देणे आणि कार्यालयीन शिस्त पाळणे अपेक्षित आहे. कार्यालयीन उपस्थितीबाबत विचारणा केल्यानंतरही समाधानकारक स्पष्टीकरण मिळत नसेल, तर अशा प्रकारांची वरिष्ठ पातळीवर दखल घेणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
डाकघर अधीक्षक म्हणतात, इंटरनेट सेवा लवकरच सुरू करणार!
या प्रकरणाबाबत चिपळूण विभागाचे डाकघर अधीक्षक यांच्याशी संपर्क साधला असता, तळवली पोस्ट ऑफिसमधील इंटरनेट सेवा लवकरच सुरू करण्यात येईल, आम्ही प्रयत्न करत आहोत, असे त्यांनी सांगितले. तसेच डाक सहाय्यक रामराज मीना यांचे वर्तन चुकीचे असल्याचे नमूद करून त्यांना योग्य समज देण्यात येईल, असेही स्पष्ट केले. या प्रकरणी लेखी तक्रार प्राप्त झाल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केवळ समज देऊन थांबू नये!
डाकघर अधीक्षकांनी इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याबाबत दिलेल्या आश्वासनाची तातडीने अंमलबजावणी करावी. तसेच डाक सहाय्यकांच्या उपस्थितीबाबतच्या तक्रारीची उपलब्ध पुरावे आणि कार्यालयीन नोंदींच्या आधारे चौकशी करावी. अनियमितता आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी.
जनतेच्या पैशातून वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जनतेलाच वेठीस धरणे कितपत योग्य आहे? ग्रामीण जनतेला वेळेवर सेवा मिळणार की त्यांना अशाच प्रकारे हेलपाटे मारावे लागणार? आता तरी वरिष्ठ डाक अधिकारी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन ठोस पावले उचलणार का, याकडे तळवलीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



