शिक्षणप्रेमी रत्नाकर आग्रे काळाच्या पडद्याआड; तळवलीवर शोककळा
गावच्या शैक्षणिक, सामाजिक विकासात मोलाचे योगदान; तळवली येथे अंत्यसंस्कार

तळवली ( प्रतिनिधी ) : तळवली गावचे ज्येष्ठ, अनुभवी, स्पष्टवक्ते आणि निस्वार्थी सेवाभावी व्यक्तिमत्त्व रत्नाकर आग्रे यांचे शुक्रवार, दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८ वाजता डोंबिवली येथे दुःखद निधन झाले. रविवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता तळवली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने तळवली गावातील एक ज्येष्ठ मार्गदर्शक आणि शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्त्व हरपले असून, संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
कै. रत्नाकर आग्रे यांना सामाजिक आणि शैक्षणिक कार्याची विशेष आवड होती. ‘शाळा हेच माझे मंदिर’ ही भावना मनात बाळगून प्रत्येक सामान्य कुटुंबातील मुला-मुलींनी उच्च शिक्षण घ्यावे, सुशिक्षित व्हावे आणि सुसंस्कृत नागरिक म्हणून घडावे, यासाठी ते नेहमी आग्रही असत. “यशाची पायरी चढताना मागे वळून पाहू नका; पण यशाचे शिखर गाठल्यानंतर मागे वळून पाहायला विसरू नका,” हा त्यांचा संदेश अनेकांसाठी प्रेरणादायी होता.
सेवानिवृत्तीनंतरही त्यांचे मन गावातील शैक्षणिक कार्यातच रमलेले असायचे. गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी, पाटपन्हाळेचे ते संचालक होते. या संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, तळवलीच्या विकासासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. विद्यालयाच्या प्रगतीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. तसेच गटविकास मंडळ, तळवली येथे पदाधिकारी म्हणूनही त्यांनी यशस्वी काम केले. शिक्षणासोबतच सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा आणि साहित्य अशा विविध क्षेत्रांत त्यांनी आपला ठसा उमटविला.
कै. आग्रे हे मनमिळावू, प्रेमळ आणि आपुलकीने वागणारे व्यक्तिमत्त्व होते. गावातील प्रत्येक व्यक्तीशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करणे आणि ते आयुष्यभर जपणे, हा त्यांच्या स्वभावाचा विशेष गुण होता. रस्त्यात भेटलेल्या व्यक्तीची दोन क्षण थांबून विचारपूस करणे, तसेच गावातील प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होणे, यातून त्यांची माणुसकी दिसून येत असे.
शांत, संयमी आणि मितभाषी असतानाही आपल्या विचारांतून प्रभाव पाडणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वांना भावत असे. साधी राहणी, निस्वार्थी वृत्ती, दूरदृष्टी आणि गावाच्या विकासाविषयीची तळमळ यांमुळे त्यांनी समाजात आदराचे स्थान निर्माण केले होते.
त्यांच्या निधनाने तळवली गावाने केवळ एक ज्येष्ठ नागरिक गमावला नसून, शिक्षणासाठी प्रेरणा देणारा मार्गदर्शक, सामाजिक कार्याचा आधार आणि सर्वांना आपलेसे करणारा माणूस गमावला आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण आहे.
माणूस शरीराने दूर जातो; मात्र त्याने जपलेली माणसे, दिलेले प्रेम आणि केलेले सत्कार्य यांमुळे तो कायम स्मरणात राहतो. कै. रत्नाकर आग्रे यांच्या कार्याचा आणि आठवणींचा ठेवा तळवलीकरांच्या मनात सदैव जिवंत राहील, अशा भावना त्यांच्या आठवणींना उजाळा देत अनेकांनी व्यक्त केल्या.



