Uncategorizedकोकणरत्नागिरी

गुहागर तालुक्यात १२०० बंधाऱ्यांचे उद्दिष्ट; आतापर्यंत ५०० बंधारे पूर्ण!

उर्वरित ७०० बंधारेही लवकरच पूर्ण करणार – सभापती प्रणव पोळेकर यांचा विश्वास

आबलोली (संदेश कदम) : राज्यात अल निनोच्या प्रभावामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पावसाचे पाणी जमिनीत जिरवणे आणि भूजल पातळी वाढवणे आवश्यक आहे. यासाठी राज्यभर राबविण्यात येत असलेल्या बंधारे मोहिमेला गुहागर तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यात आतापर्यंत सुमारे ५०० बंधारे बांधण्यात आले असून, आणखी ७०० बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट येत्या काही दिवसांत पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर यांनी व्यक्त केला.

रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या आवाहनानुसार १६ ऑक्टोबर रोजी राज्यभर बंधारे बांधण्याची मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत गुहागर तालुक्यातील आबलोली येथील वाकी नदीवर निर्मल ग्रामपंचायत आबलोलीच्या माध्यमातून लोकसहभागातून आणि जेसीबीच्या सहाय्याने वनराई बंधारा बांधण्यात आला. या कामाला सभापती प्रणव पोळेकर आणि उपसभापती निलेश सुर्वे यांनी भेट देऊन ग्रामस्थांचे कौतुक केले.

यावेळी बोलताना सभापती पोळेकर म्हणाले की, ८ ऑक्टोबर रोजी पंचायत समितीची आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत विविध ग्रामपंचायतींच्या माध्यमातून बंधारे बांधण्याचे नियोजन करून आराखडा तयार करण्यात आला. त्यानुसार आबलोली येथे बंधारे बांधण्याचे काम सुरू झाले असून, ग्रामस्थांनी केलेल्या संकल्पाला यश मिळत आहे. या उपक्रमात सहभागी झालेल्या सरपंच आणि ग्रामस्थांचे त्यांनी आभार मानले.

भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न

तालुक्यात पाण्याचे स्रोत कमी होत असून, भूजल पातळीत सुमारे १.४१ मीटरने घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन पाणी जमिनीत जिरवण्यासाठी आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी मिशन बंधारे मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या मोहिमेतून तालुक्यात बंधाऱ्यांची साखळी निर्माण होत असून, मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी होत आहेत. आतापर्यंत ५०० बंधारे पूर्ण झाले असून, उर्वरित ७०० बंधाऱ्यांचे उद्दिष्टही लवकरच पूर्ण करू, असा विश्वास पोळेकर यांनी व्यक्त केला.

यावेळी सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, सरपंच वैष्णवी नेटके, ग्रामपंचायत अधिकारी बाबुराव सूर्यवंशी, पोलीस पाटील महेश भाटकर, ग्रामपंचायत सदस्य रूपाली कदम व नम्रता निमूणकर, सामाजिक कार्यकर्ते सचिन कारेकर व संतोष पालशेतकर, माजी सरपंच प्रमेय आर्यमाने, योगेश पालशेतकर, योगेश भोसले, समीर शिंदे, रेणुका पवार, प्रथमेश निमूणकर, प्रशांत नेटके, उदय सुर्वे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button