गुहागरमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; विविध योजनांच्या लाभांचे वितरण
पाटपन्हाळे येथे महाराजस्व समाधान शिबिर; दाखले, आयुष्मान कार्ड, शिधापत्रिका व अन्य सेवांचा नागरिकांना लाभ

गुहागर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राज्यभर राबविण्यात आलेल्या ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ गुहागर तालुक्यात विविध शासकीय सेवा आणि योजनांचे लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले. या अभियानाच्या अनुषंगाने शनिवार, दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी पाटपन्हाळे येथील ग्रामपंचायत सभागृहात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ आयोजित करण्यात आले होते.
‘सेवा परमोधर्म’ या उक्तीप्रमाणे सामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ सहजपणे मिळावा आणि विविध प्रशासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात आले.
पाटपन्हाळे येथे आयोजित या शिबिराला पंचायत समितीचे उपसभापती निलेश सुर्वे, गुहागर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष प्रदीप बेंडल, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी, पंचायत समिती सदस्य उर्वी खैर, मंगेश जोशी व स्नेहा शिगवण, तहसीलदार परिक्षीत पाटील, तालुका कृषी अधिकारी अमोल क्षीरसागर, वैद्यकीय अधीक्षक बळवंत, तालुका आरोग्य अधिकारी घनश्याम जांगीड, नायब तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच विद्यार्थी आणि नागरिकांनीही शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

विविध शासकीय सेवा एकाच छताखाली
या शिबिराच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजना, शिधापत्रिका, विविध शासकीय दाखले, सातबारा उतारा व फेरफारविषयक कामकाज, आधार कार्ड वितरण, आयुष्मान कार्ड, महिला शेतकरी प्रमाणपत्र आणि ई-केवायसी अशा विविध सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या. याशिवाय विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरणही करण्यात आले.
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच अंगणवाडी कार्यकर्त्यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
विविध शासकीय विभागांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत नागरिकांची कामे सुलभ करण्यावर या शिबिरात भर देण्यात आला. शासकीय योजनांची माहिती आणि लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने ‘सेवा संकल्प अभियान’ उपयुक्त ठरले.



