कोकणरत्नागिरीसामाजिक

जानवळेच्या उपसरपंचपदाची धुरा मंगेश कोंडविलकरांकडे

साडेतीन वर्षांच्या कार्याची पावती

गुहागर प्रतिनिधी :  तालुक्यातील जानवळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मंगेश रामदास कोंडविलकर यांची निवड झाली. उपसरपंच वैभवी विनोद जानवळकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक घेण्यात आली.

या निवडणुकीत मंगेश कोंडविलकर आणि प्रसन्न प्रकाश पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मतदानामध्ये मंगेश कोंडविलकर यांना ७ मते, तर प्रसन्न प्रकाश पाटील यांना ३ मते मिळाली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तथा ग्रामपंचायत अधिकारी गोरक्ष सोनावणे यांनी मंगेश कोंडविलकर यांची उपसरपंचपदी निवड झाल्याचे जाहीर केले.

मंगेश कोंडविलकर हे गावातील विविध सार्वजनिक उपक्रमांमध्ये नेहमीच पुढाकार घेणारे युवक म्हणून परिचित आहेत. सामाजिक व सार्वजनिक काम करताना तन, मन आणि धनाने निस्वार्थीपणे योगदान देण्याची त्यांची भूमिका राहिली आहे. गावातील नागरिकांशी सलोख्याचे आणि आपुलकीचे संबंध असल्याने ग्रामस्थांमध्ये त्यांच्याविषयी विश्वासाचे वातावरण आहे.

ग्रामपंचायत सदस्य म्हणून गेल्या साडेतीन वर्षांच्या कालावधीत गावाच्या स्थानिक विकासाच्या प्रश्नांसाठी केलेले प्रयत्न, विविध कामांसाठी दिलेले सहकार्य आणि सार्वजनिक उपक्रमांमधील सहभाग यामुळे ग्रामस्थांचा त्यांच्यावरील विश्वास अधिक दृढ झाला. याच कार्याची दखल घेत ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त करत उपसरपंचपदाची जबाबदारी सोपविली.

यावेळी ग्रामपंचायत सरपंच जान्हवी विखारे, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य वैभवी विनोद जानवळकर, सदस्य मुबीन ठाकूर, अनिल कोलंबेकर, सेजल धामणस्कर, विजया शितप, अनिता जाधव, विभावरी लांजेकर आदी उपस्थित होते.

मंगेश कोंडविलकर यांच्या निवडीबद्दल गुहागर पंचायत समितीचे उपसभापती निलेश सुर्वे, पंचायत समिती सदस्य गौरव वेल्हाळ, कोतळूक ग्रामपंचायत उपसरपंच सचिन ओक, साईनाथ कळझुणकर, सचिन कोंडविलकर, प्रशांत शिरगावकर, संदीप कोंडविलकर, महेश जाधव, विनोद जानवळकर, तेजस कोंडविलकर, महेश तांबे तसेच जानवळे गावातील ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button