
चिपळूण : लोकशाहीवरील संकट, SIR प्रक्रियेतील गोंधळ, मतदार यादीतील अनियमितता, निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेबाबत उपस्थित होणारे प्रश्न तसेच कोकणातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई न मिळाल्याच्या मुद्द्यांवर आवाज उठवण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने उद्या चिपळुणात सर्वपक्षीय निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाचे नेतृत्व आमदार भास्करराव जाधव करणार आहेत.
बुधवार, ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा, बहादूरशेख नाका येथून मोर्चा निघून प्रांत कार्यालय, चिपळूण येथे त्याची सांगता होणार आहे.
लोकशाही, संविधान आणि निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेशी संबंधित विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. तसेच कोकणातील शेतकऱ्यांना अपेक्षित नुकसानभरपाई मिळावी, यासाठीही या मोर्चातून आवाज उठविण्यात येणार आहे.
हा मोर्चा कोणत्याही एका पक्षापुरता मर्यादित नसून लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे. महिला, शेतकरी, युवा, ज्येष्ठ नागरिकांसह सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



