
विसापूर (दत्ताराम नवरत) : गुहागर तालुक्यातील जि. प. पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा, विसापूर येथील मुख्याध्यापक निलेश जाधव सर यांचा वाढदिवस पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागातून आनंदात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वतः पैसे जमा करून सरांना सरप्राईज देत वाढदिवसाचे सुंदर नियोजन केले.
यावेळी बोलताना मुख्याध्यापक निलेश जाधव म्हणाले, “ज्या दिवसापासून जि. प. पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा विसापूरचा मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी स्वीकारली, त्या दिवसापासून शाळेतील प्रत्येक विद्यार्थी मला माझाच वाटू लागला. ही मुले केवळ माझे विद्यार्थी नसून माझ्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहेत. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मला जे काही करता येईल, ते करण्याचा माझा सदैव प्रयत्न राहील.”

अभ्यास, शैक्षणिक साहित्य, खेळ तसेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक बाबतीत मुलांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये, हीच आपली मनापासूनची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.
“आज माझा वाढदिवस असला तरी या वाढदिवसाची उत्सुकता माझ्यापेक्षा माझ्या विद्यार्थ्यांनाच अधिक होती. मला सरप्राईज देण्यासाठी या चिमुकल्यांनी स्वतः पैसे जमा केले, एकत्र येऊन नियोजन केले आणि माझ्यासाठी अविस्मरणीय आनंदाचा क्षण निर्माण केला. त्यांच्या डोळ्यातील आनंद, चेहऱ्यावरचे हसू आणि माझ्याविषयीचे निरागस प्रेम हीच माझ्यासाठी वाढदिवसाची सर्वात मोठी भेट आहे,” असे जाधव सरांनी भावनिक होत सांगितले.
वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी चिकन, वडे, हलवा, सलाड आणि वेफर्स अशा विविध पदार्थांची मेजवानी आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी या मेजवानीचा मनमुराद आनंद घेतला. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आपला वाढदिवस खऱ्या अर्थाने सार्थकी लागल्याचे जाधव सरांनी सांगितले.
या मेजवानीसाठी प्रेमाने व आपुलकीने स्वयंपाक करणाऱ्या पालक व ग्रामस्थांचेही त्यांनी मनःपूर्वक आभार मानले. “आपल्या मुलांच्या आनंदासाठी आणि शाळेसाठी आपण देत असलेला वेळ, सहकार्य आणि प्रेम हीच आमची खरी ताकद आहे,” असे त्यांनी नमूद केले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष पांडुरंग शिगवण, शंकर आग्रे, रमेश बारगुडे, वैभव किर्वे, गीता पडवळ, प्रिया कदम, ज्योती कदम, संजना मेढेकर, मानसी पडवळ, स्नेह वेद्रे, वैभवी रामाणे, नम्रता वेद्रे, अंगणवाडी सेविका श्रावणी धोपट, ग्रामपंचायत विसापूरचे ग्रामसेवक घेवडे यांच्यासह पालक, महिलावर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.
उपस्थितांनी मुख्याध्यापक निलेश जाधव सरांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या पुढील कार्यासाठी भरभरून आशीर्वाद दिले. जाधव सरांनी विसापूर ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.



