
संगमेश्वर (अमर सावंत) : भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा रत्नागिरी व तालुका शाखा संगमेश्वर यांच्या वतीने आयोजित वर्षावास प्रवचन मालिकेतील एक पुष्प ग्रामशाखा शेंबवणे येथील तक्षशिला बुद्धविहारात २६ सप्टेंबर २०२६ रोजी मंगलमय वातावरणात उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे उत्तम नियोजन भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा शेंबवणेच्या वतीने करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून, दीपप्रज्वलन व अभिवादनाने झाली. त्यानंतर उपस्थित उपासक-उपासिकांनी पंचशील ग्रहण केले. प्रवचनकार आयु. प्रमोद सावंत यांचा यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी आयु. प्रमोद सावंत यांनी ‘भाद्रपद पौर्णिमा – चार ब्रह्मविहारे’ या विषयावर अभ्यासपूर्ण प्रवचन केले. ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथातील दाखले तसेच दैनंदिन जीवनातील उदाहरणांच्या माध्यमातून त्यांनी विषयाचे सविस्तर विवेचन केले.
मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा ही चार ब्रह्मविहारे प्रत्येकाने आपल्या जीवनात रुजविल्यास मानवी जीवन अधिक सुखी, शांततामय आणि समताधिष्ठित होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. मैत्री म्हणजे इतरांच्या सुखाची इच्छा, करुणा म्हणजे इतरांचे दुःख दूर व्हावे अशी भावना, मुदिता म्हणजे इतरांच्या आनंदात सहभागी होऊन आनंद मानणे, तर उपेक्षा म्हणजे मन विचलित न होऊ देता समत्वभाव जोपासणे होय, असे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला शेंबवणे ग्रामशाखेचे सभासद तसेच मुंबईहून आलेले अनेक उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. वर्षावास प्रवचन मालिका यशस्वी करण्यासाठी ग्रामशाखेतील बंधू-भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आयु. प्रदीप तांबे यांनी सांभाळली. शेवटी सरणत्तय पठणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



