Uncategorizedकोकणरत्नागिरी

शृंगारतळी पोलीस चौकीसमोरून दुचाकी चोरी; सीसीटीव्ही फुटेजमुळे चोरटा जेरबंद

शृंगारतळी (दिनेश चव्हाण) : शृंगारतळी पोलीस चौकीसमोरूनच दुचाकी चोरीला गेल्याची घटना सोमवार, दि. २७ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली. ग्रामपंचायतीने परिसरात बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीची घटना कैद झाल्याने संशयित चोरट्याचा शोध घेणे शक्य झाले. या प्रकरणी गुहागर पोलिसांनी चोरट्यासह दुचाकी खरेदी करणाऱ्या भंगार व्यावसायिकाला ताब्यात घेतले असून दोघांची चौकशी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास एका परप्रांतीय इसमाने पोलीस चौकीसमोरील दुचाकी चोरून नेली. त्यानंतर ही दुचाकी एका भंगार व्यावसायिकाला अवघ्या १ हजार ७०० रुपयांना विकल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
दरम्यान, ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीची घटना कैद झाल्याने दुचाकी मालकाने फुटेजच्या आधारे संशयिताचा शोध घेतला. त्यानंतर संशयिताला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती आहे.

या प्रकरणात दुचाकी चोरी करणाऱ्या व्यक्तीसोबतच ती अत्यल्प किमतीत खरेदी करणाऱ्या भंगार व्यावसायिकाची भूमिकाही पोलिसांकडून तपासली जात आहे. दुचाकी चोरीची असल्याची माहिती त्याला होती का, तसेच या व्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. दोष आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.

ताब्यात घेतलेल्या संशयिताकडून यापूर्वीच्या आणखी काही चोऱ्यांची माहिती समोर येते का, तसेच त्याच्यासोबत अन्य व्यक्तींचा सहभाग आहे का, याबाबतही गुहागर पोलीस चौकशी करीत आहेत.

विशेष म्हणजे, पोलीस चौकीसमोरूनच दुचाकी चोरीला गेल्याने परिसरातील नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत असून, पोलिसांचा धाक चोरट्यांमध्ये राहिला आहे का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. या घटनेमुळे शृंगारतळी परिसरातील वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button