महाराष्ट्रराजकीय

दीक्षाभूमीच्या पावित्र्याच्या संरक्षणासाठी रिपब्लिकन पक्षाचे आझाद मैदानात आंदोलन

चंद्रपूरमधील बुद्धविहार पाडण्याची कारवाई थांबविण्याची खोरिपाची मागणी;

मुंबई  प्रतिनिधी (अजित मोहिते): चंद्रपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमीवरील बुद्धविहाराचे संरक्षण करून त्याचे ऐतिहासिक व धार्मिक पावित्र्य अबाधित ठेवावे, तसेच विहार पाडण्याची कोणतीही कारवाई तातडीने थांबवावी, या मागणीसाठी रिपब्लिकन पक्ष (खोरीपा) मुंबई प्रदेशाच्या वतीने मंगळवारी, २२ सप्टेंबर रोजी आझाद मैदान येथे निदर्शने करण्यात आली.

पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष भागवत कोंडीबा कांबळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात निवेदन सादर केले. चंद्रपूरची दीक्षाभूमी बौद्ध आणि आंबेडकरी चळवळीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १६ ऑक्टोबर १९५६ रोजी येथे सुमारे तीन लाख अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. ही त्यांच्या आयुष्यातील शेवटची धम्मदीक्षा असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

पक्षाच्या म्हणण्यानुसार, दीक्षाभूमीच्या व्यवस्थापनासाठी दिवंगत बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, चंद्रपूरची स्थापना केली होती. तसेच १६ ऑक्टोबर १९८१ रोजी दीक्षाभूमीवरील बुद्धविहाराचे भूमिपूजन भदंत डॉ. आनंद कौसल्यायन यांच्या हस्ते आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते.

चंद्रपूरचे विद्यमान आमदार किशोर जोरगेवार आणि काही मंडळी ऐतिहासिक दीक्षाभूमीचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप पक्षाने केला आहे. या आरोपांची निष्पक्ष चौकशी करावी, तसेच दीक्षाभूमी परिसरातील प्रस्तावित किंवा सुरू असलेल्या कामांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

दीक्षाभूमीशी संबंधित कोणताही निर्णय घेताना संबंधित संस्था आणि बौद्ध समाजाच्या प्रतिनिधींना विश्वासात घ्यावे. ऐतिहासिक वास्तूचे नुकसान, पाडकाम किंवा तिच्या मूळ स्वरूपात बदल होणार नाही, याची शासनाने हमी द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष देशक गिरीशबाबू खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाऊ निरभवणे, हेमंत मोकळ, विनोद साळवी, नंदकुमार रोकडे, शशिकांत भालेराव, चंद्रकांत घोडके, मुकेश शिंदे, विक्रांत पाटील यांच्यासह सुधाकर जानराव, सलीम सय्यद, प्रकाश सोनकांबळे, विक्रम कांबळे, गौतम कांबळे, राजेंद्र मांजलकर, गणेश साळवे, गणेश साठे आणि विपुल देठे आदी सहभागी झाले.

यावेळी रिपब्लिकन पक्ष (खोरीपा)चे संस्थापक नेते तथा माजी राज्यसभा उपसभापती बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या कार्याचा गौरव करण्याची आणि त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणीही करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button