सीपीआर शिकण्याचा अपोलो हॉस्पिटल्सचा विश्वविक्रम!
३० दिवसांत ६१,२२१ नागरिकांची शपथ; १२० हून अधिक संस्थांचा सहभाग

मुंबई (अजित मोहिते) : आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचवण्यासाठी सामान्य नागरिकांनीही सीपीआर देण्यासाठी सज्ज राहावे, या उद्देशाने नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने राबविलेल्या ‘सज्ज आहेत माझे हात’ या मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. ८ जुलै ते ७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत झालेल्या या मोहिमेत तब्बल ६१,२२१ नागरिकांनी सीपीआर शिकण्याची शपथ घेतली.
या उपक्रमात शाळा, महाविद्यालये, कार्यालये आणि सामाजिक संस्थांसह १२० हून अधिक संस्थांनी सहभाग घेतला. सुरुवातीला ५० हजार नागरिकांना सीपीआर शिकण्याची शपथ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हे लक्ष्य मोठ्या फरकाने पार झाले.

या कामगिरीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने ‘एका महिन्यात सीपीआर शिकण्याचा सर्वाधिक संकल्प’ म्हणून अधिकृत नोंद केली. यावेळी अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्रायझेस लिमिटेडच्या कार्यकारी उपाध्यक्षा डॉ. प्रीथा रेड्डी, अपोलो हॉस्पिटल्सच्या पश्चिम विभागाचे प्रादेशिक सीईओ अरुणेश पुनेथा आणि पश्चिम विभागाच्या आपत्कालीन विभागाचे प्रादेशिक संचालक डॉ. नितीन जगशिया यांनी सीपीआर जनजागृतीचा संदेश दिला.
डॉ. प्रीथा रेड्डी यांनी नागरिकांच्या सहभागाचे कौतुक करत, सीपीआरचे ज्ञान देशभरातील अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची गरज व्यक्त केली. तर अरुणेश पुनेथा यांनी ही चळवळ नवी मुंबईपुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण भारतात पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला. डॉ. नितीन जगशिया यांनी हृदयाशी संबंधित आपत्कालीन प्रसंगी सुरुवातीची काही मिनिटे अत्यंत महत्त्वाची असल्याने सामान्य नागरिकांना सीपीआरचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक असल्याचे सांगितले.
‘सज्ज आहेत माझे हात’ या मोहिमेतून नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत योग्य वेळी योग्य कृती करण्यासाठी सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात आला.



